लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चोरट्या मार्गाने खामगावात आलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा बुधवारी सकाळी पालिका प्रशासनाने जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील गांधी चौकात ही कारवाई केली.खामगाव शहरात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री चोरी-छुपे विक्री केली जाते. शहरातील काही मोठ्या व्यावसायिकांकडून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा लहान विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येतो. दरम्यान, अकोला येथून एका व्यावसायिकाने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची मागणी केली. बुधवारी सकाळी अकोला येथून आलेला हा साठा बाळापूर बायपास मार्गे गांधी चौकात आणण्यात येत होता. त्यावेळी काही सफाई कामगारांना हा प्लास्टिक साठा दिसला. त्यांनी लागलीच मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोग्य निरिक्षक अनंत निळे, संजय तंबोले, प्रशांत आनंदे आणि सफाई कामगार गांधी चौकात धडकले. त्यांनी एका तीन चाकी गाडीतून जात असलेला हा साठा गांधी चौकात पकडून जप्त केला. तीनचाकी सायकल रिक्षासह सहा क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त!बाळापूर बायपास येथून एका वाहनातून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या उतरविण्यात आल्या. तीन चाकी सायकल रिक्षातून या पिशव्या गांधी चौकात आणण्यात येत होत्या. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाने या पिशव्या जप्त केल्या. प्रत्येकी ५० किलोचे सहा कट्टे या रिक्षात होते. सायकल रिक्षासह प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला.
साठाजप्त; व्यावसायिक मोकाट!
जप्त करण्यात आलेला प्लास्टिकचा साठा नेमका कोठे आणि कोणत्या व्यापाºयाकडे जात होता. याची पडताळणी करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला असला तरी, हा साठा नेमका कोणत्या व्यापाºयाचा आणि कोठे जात होता. हे एक कोडेच आहे.