बुलडाणा - अवघ्या सहा वर्षाच्या मुलाला चार अल्पवयीन मुलांनी चिखली तालुक्यातील पळसखेड भट येथील धरणात बुडवून मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकरा, नऊ, आठ आणि दहा वर्षाच्या चार मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना सहा जून गुरुवारी ज्युनाईल कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी अवघ्या सहा वर्षाच्या मुलाचा खून केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
या घटनेत मृत्यू पावलेल्या निरागस सहा वर्षाच्या मुलाचे नाव बिटू मिठाईलाल चौधरी असे आहे. उत्तरप्रदेशातील काळीधाडी सरकोठा येथील तो रहिवासी आहे. सैलानी येथे त्याची आई फुलारीदेवी मिठाईलाल चौधरी (वय 36) आणि त्याच्या दोन भावांसह तो अलिकडील काळात राहत होता. दरम्यान, चार जून रोजी सैलानी येथीलच अकरा, नऊ, आठ आणि दहा वर्षाच्या मुलांनी त्यास पिंपळगाव सराई-पळसखेड मार्गावर असलेल्या धरणावर नेले होते. तेथे बिट्टूला उपरोक्त चौघांनी पाण्यात बुडवून मारले, अशा आशयाच्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी अल्पवयीन चारही मुलांविरोधात खूनाचा गुन्हा पाच जून रोजी दाखल केला आहे. आता या मुलांना बुलडाणा येथे सहा जून रोजी ज्युनाईल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रशांत सपकाळे हे करीत आहेत. मात्र चारही अल्पवयीन व अबोध मुलांनी अवघ्या सहा वर्षाच्या बिट्टूला नेमके कोणत्या कारणावरून मारले हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.