बुलढाणा: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून २६ एप्रिल रोजी पहाटे सात वाजता शांततेत मतदानास प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासामध्ये ६.६१ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे प्रारंभीची सुरवात तुर्तास चांगली झाली असली तरी मतादनाचा वेग धिमा आहे.
यामध्ये बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये ४.४२ टक्के, चिखलीमध्ये ९.७० टक्के, जळगाव जामोदमध्ये ३.१९ टक्के, खामगावमध्ये ५.७९, मेहकरमध्ये ९.०७, सिंदखेड राजात ७.४० मतदान पहिल्या दोन तासामध्ये झाले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण २१ उमेदवार भाग्य आजमावित आहे. यात शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव, उद्धवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर, अपक्ष रविकांत तुपकर, संदीप शेळके यांच्यासह अन्य उपमेदवारांचा समावेश आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी १७ लाख ८२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून १ हजार १०४ ठिकाणी १ हजार ९६२ मतदान केंद्र आहेत.
दरम्यान पहिल्या टप्प्यात धिम्या गतीने मतदान होत असले तरी दुपारी मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय विचार केल्यास जळगाव जामोदमध्ये मतदानाचा टक्का पहिल्या दोन तासात अत्यंत कमी आहे. बुलढाण्यामध्येही तिच परिस्थिती आहे. चिखलीमध्ये सर्वाधिक असे ९.७० टक्के मतदान झाले असून मेहकर व सिंदखेड राजामध्येही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.