- मनोज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : सद्यस्थितीत सर्वत्र शेतशिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. दरम्यान बाजारात एक नवनिर्मित मानवचलीत लहानसे पेरणी यंत्र उपलब्ध झाले असून सदर यंत्रांची हाताळणी अत्यंत सुलभ व सोयीची आहे. त्यामुळे वेळेची व पेरणी खर्चाची बचत होऊन पेरणीसुद्धा योग्य पद्धतीने होत असल्याने सदर नवनिर्मिती पेरणी यंत्र शेतकऱ्यांकरिता वरदान ठरू पाहत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पेरणी यंत्र मोताळा तालुक्यातील मौजे दाभाडी या छोट्याशा गावात एका तरुण शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे.मानवचलित पेरणी यंत्र ऍक्रेलिक फायबर पासून निर्मिती करण्यात आले असून यंत्र हाताळणी करिता लोखंडी हँडल देण्यात आले आहे. तसं पाहता यंत्र नाजूक दिसत असलं तरी त्याने आपला टणकपणा चांगलाच जपला आहे. या यंत्राला कसलाही दुरुस्ती खर्च सुद्धा लागत नाही. त्यामुळे यंत्राचा वापर करणे प्रत्येकाला परवडणारे आहे. या यंत्राद्वारे शेतात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील प्रत्येक पिकाची पेरणी होऊ शकते. जवळपास एका तासामध्ये दोन ओळींतील अंतर चार फूट असल्यास एक एकर क्षेत्र एका तासामध्ये पूर्ण होते. दोन ओळीमधील अंतर दोन फूट असल्यास दोन तासांमध्ये एका मजूराकडून पेरणी पूर्ण होते. या यंत्राने आपण १-२-३-४-५-६ अशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित असे बी टाकू शकतो. तसेच दोन बियाणं मधील अंतर सहा इंचापासून दोन फुटापर्यंत आपण ठेवू शकतो. विविध पिके लागवड करताना एकरी अंदाजानुसार जे मनुष्यबळ लागतं ते पाहता या यंत्राद्वारे केवळ एकच व्यक्ती त्या मनुष्य बळाप्रमाणे पेरणी करू शकतो त्यामुळे मजुरीचा अवाढव्य खर्च आपसूकच कमी होतो. उदाहरणार्थ एका माणसाकडून दिवसभरामध्ये तीस मजुरांचे काम या यंत्राद्वारे सहज रित्या करता येते. पेरणी दरम्यान ज्या पद्धतीने ज्या अंतराने बियाण्यांची लागवड करायची आहे त्या अंतराची ऍडजेस्टमेंट सुद्धा या यंत्रात होते. त्यामुळे पेरणीकरिता लागणाऱ्या मजुरांची गरज सुद्धा भासत नाही.
पेरणीवर होणारा खर्च व वेळ पाहता तो वाचावा, पेरणी सुलभ व्हावी या अनुषंगाने मी तामिळनाडूतून मानव चलित पेरणी यंत्र आणून आधी ते स्वतः वापरले. त्याचा फायदा पाहता हा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा या भावनेतून मी सदर यंत्र मागणीनुसार नफा ना तोटा या तत्त्वावर शेतकऱ्यांना आणून देत आहे.- योगेश पांडुरंग पाटीलशेतकरी रा. दाभाडी. ता. मोताळा
मागील वर्षी रब्बी हंगामात मी माझ्या शेतात सोयाबीन, भुईमूग व उडीद या पिकाची पेरणी या यंत्राद्वारे केवळ दोन मजुरांकरवी करून घेतली. या यंत्रामुळे मजुरीचा खर्च वाचला आहे. शेतकऱ्यांनी जर हे मानवचलित यंत्र शेतात पेरणी करिता वापरले तर मजुरी करिता शेतकऱ्यांची होणारी भटकंती थांबली. -अरविंद पाटीलशेतकरी रा. दाभाडी, ता. मोताळा