ऑनलाइन लोकमत/ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. 17 - जिल्ह्यातील ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, १५५५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. मोबाईल डिजीटलकडे शाळांचा ओढा वाढल्याने शिक्षकांच्या हातात खडूच्या एवजी आता ‘स्मार्टफोन’ दिसू लागले आहेत. मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना विविध संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या जात असून, जिल्ह्यातील शिक्षकांनी आतापर्यंत ४७७ शैक्षणिक व्हिडीओ तयार केले आहेत.
शिक्षण विभागाने राज्यभरातील जिल्हा परिषद व प्राथमिक शाळांमध्ये मोबाईल डिजीटल शिक्षण उपक्रम हाती घेतला आहे. डिजीटलची संकल्पना हळुहळु अंमलात आणली जात आहे. मोबाईल डिजीटल शिक्षण उपक्रमात अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा आघाडीवर दिसून येतो. विद्यार्थ्यांना शिक्षणाची संकल्पना समजावून त्यात गोडी निर्माण करण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने राज्यात मोबाईल डिजीटल हा उपक्रम सुरू केला. सुरूवातीला राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग १०० टक्के राबविण्यात आला. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातही मोबाईल डिजीटल उपक्रम यशस्वीरित्या रुळला आहे. जिल्ह्यातील १
हजार ५५५ शाळांमध्ये मोबाईलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील शिक्षकांनी आतापर्यंत ४७७ शैक्षणिक व्हिडीओ तयार केले आहेत. या उपक्रमात शिक्षकांजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या मदतीने व शिक्षणासंबंधी विविध अॅप्स डाऊनलोड करून मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्यात येते. तसेच संगणकाचा वापर करीत शाळा डिजीटल करण्याच्या सूचना राज्यातील सर्व शाळांना देण्यात आल्या
आहेत. त्याची अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यातील शाळांमध्ये चांगल्या प्रकारे राबविली जात आहे. जिल्ह्यातील जवळपास ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, अनेक शाळांत डिजीटल क्लास रूमदेखील तयार करण्यात आल्या आहेत. शिक्षकांजवळील स्मार्टफोन मध्ये ई- बालभारती सारख्या अनेक विविध पुस्तके डाऊनलोड करून मोबाईलच्या स्क्रीनसमोर मोठ्या भगाच्या माध्यामातून डिजीटल शिक्षण देण्यात येत आहे.
विदर्भात बुलडाणा जिल्हा यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, वर्गात त्यांची उपस्थिती वाढावी आणि त्यांना डिजीटल संकल्पनेचा परिचय व्हावा, अशा उद्देशाने मोबाईल डिजीटल शाळा हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यांमध्ये डिजीटल शाळेचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी केला आहे.
लोकसहभागातून १४ लाख ७९ हजार निधी
जिल्ह्यातील ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, बहुतांश शाळांमध्ये डिजीटल रुम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात आयएसओ मानांकन प्राप्त शाळांची संख्या दोन आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर शाळांही आयएसओ मानांकनाच्या
दिशेने वाटचाल करित असल्याने जिल्ह्या परिषद शाळांचे रुप बदलत असल्याचे दिसून येत आहे. शाळा डिजीटल करण्यासाठी लोकसहभगाही महत्वाचा आहे.
त्याकरिता लोकसहभागातून १० हजार पेक्षा अधिक निधी जमा करणा-या शाळांची संख्या १०९ आहे. तर १४ लाख ७९ हजार २ रुपये निधी लोकसहभागातून प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील ३६४ शाळा डिजीटल झाल्या असून, जि.प. शाळांमध्ये डिजीटलची संकल्पना चांगली रुळली आहे. शिक्षकांकडून शिक्षणासंबंधी विविध अॅप्स डाऊनलोड करून मुलांना मनोरंजक पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहे.
-एन.के.देशमुख,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.