खामगाव : दुपारी ४ वाजता शेगाव येथून खासगी प्रवासी गाडी खामगावसाठी निघाली. खामगाव शहर अवघे पाच किलोमीटर दूर असतानाच गाडीतून धुराचे लोट निघाले. चालकाने प्रसंगावधान राखत, तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. गाडीतील प्रवासी लगेच गाडीबाहेर आले. गाडी काही केल्या बंद होईना. तितक्यात चालकाने इंजिन आणि रेडिएटरवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर वाहनातून धुराचे लोट कमी झाले. गाडीही बंद झाली. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला.सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी एकादशी असल्यामुळे खामगाव येथून शेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गुरुवारी आणि एकादशीला भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळे भाविकांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. शुक्रवारीदेखील शेगाव येथून वाहन (एमएच-२८, एएन-१३०४) खचाखच प्रवासी घेऊन खामगावच्या दिशेने निघाले. खामगाव शहर काही अंतरावरच असताना एक महाविद्यालय आणि हनुमान मंदिराजवळ या गाडीतून वेगळाच आवाज निघत काळा धूर निघायला लागला. हा प्रकार गाडीतील महिला आणि प्रवाशांच्या निदर्शनास आला. त्यामुळे गाडीत एकच कल्लोळ उडाला.या कल्लोळात प्रसंगावधान राखत चालकाने गाडी बाजूला घेऊन प्रवाशांना खाली उतरविले. गाडी बंद करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, गाडी बंद होत नसल्याने दुसरा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी चालकही वाहनाबाहेर पडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीतून पाणी घेत, इंजिन आणि रेडिएटरवर पाण्याचा मारा केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर काळ्या धुराचे लोट आणि गाडीचा आवाज बंद पडला. आग विझताच अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला, तर वाहनातील एका महिला प्रवाशाने दैव बलवत्तर म्हणून जीव वाचल्याचा अनुभव ‘लोकमत’कडे कथन केला. रस्त्याने जात असलेल्या वाहनातील काही प्रवासी आणि चालकही प्रसंगी धावून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला -प्रवासी वाहनात शेगाव येथून सुमारे १२ ते १४ प्रवासी बसले होते. यामध्ये काही महिलांचा आणि बालकांचाही समावेश होता. गाडीतून धुराचे लोट निघाल्यानंतर काहींनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्यासाठी खटाटोप केला.