लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सर्पदंश होणे ही दुर्घटना आहे; मात्र हा अपघात की नैसर्गिक घटना, यावर अद्यापही दुमत आहे. यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात एकवाक्यता नसल्याने सर्पदंशाच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळविताना तांत्रिक पेचाला सामोरे जावे लागत आहे. उपचारासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या केस पेपरवर बरेचदा एमएलसी (मेडिकल लीगल केस) असा उल्लेख नसल्याने अडचण उद्भवत आहे.सर्पदंशाच्या अनेक घटनांमध्ये असा प्रकार निदर्शनास आला आहे. प्रत्यक्षात अशा रुग्णाला उपचारासाठी दाखल करताना केस पेपरवर एमएलसी उल्लेख अपेक्षित असतो; मात्र अपघात की नैसर्गिक घटना, अशा द्विधा मानसिकतेमधील डॉक्टरांकडून अशी नोंद होत नाही. रुग्णांचे नातेवाईक जागरूक असले तर डॉक्टरांशी चर्चा करून तसा उल्लेख करून घेतात; मात्र बहुतेक घटना खेड्यातील व्यक्तींसोबत घडत असल्याने त्यांना यासंदर्भात ज्ञान नसते, तातडीने उपचार महत्त्वाचा असल्याने विचारणा करण्याची मानसिकता नसते. अशा वेळी रुग्णांचे केस पेपर एमएलसी उल्लेखाविनाच राहतात. जिल्हास्तरावरील अनेक शासकीय रुग्णालयांमधून सर्पदंशाच्या रुग्णांच्या पुढील उपचारासाठी रेफर करायचे असल्याने केस पेपरवर एमएलसीची नोंद आवश्यक ठरते. अनेकदा रुग्णाला रेफर करताना एमएलसी नोंद नसल्यास अडचण येते. याबाबत धोरणात्मक निर्णय गरजेचा आहे.
असा आहे तांत्रिक पेच अचानक सापावर पाय पडल्याने तो डिवचला गेल्यास दंश करतो. अपघात जाणीवपूर्वक होत नाही, तसाच सर्पदंशही जाणीवपूर्वक करून घेतला जात नाही. तो सुद्धा अपघातच असतो. एखाद्याचा काटा काढण्याच्या हेतूने मुद्दाम सर्पदंश केला जात असल्यास तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात तपासानंतर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कायदेशीर अधिकार आहेत. विषारी सर्पदंशावर उपचार न झाल्यास रुग्ण दगावतो. त्यामुळे एमएलसी होणे आवश्यकच आहे. तो अपघातच मानला जावा. तांत्रिक अडचण येत असेल तर डॉक्टरांनी पोलिसांना कॉल देण्याची गरज आहे.