स्थानिक आदर्श विद्यालयाने दोन वर्षांपूर्वी सर्व जुन्या वर्गमित्रांच्या स्नेहमिलनाचा अभिनव उपक्रम राबविला होता. त्यामुळे अनेक वर्षांनंतरचे सोबती पुन्हा एकदा नव्याने भेटले. यामध्ये ३५ वर्षांनंतर १८८३ -१८८४ ची इयत्ता १० वी ची बॅच गत दोन वर्षापासून एकत्रित येत स्नेहमिलनाचा उपक्रम राबवत आहेत. ३५ वर्षांपूर्वी वेगळे झालेले मित्र एकत्रित येत असल्याने सर्वांची सुख-दु:खे वाटून घेण्याचे काम होत आहे. याच बॅचमधील बालपणापासून डोळ्याने अधू असलेले अशोक पहाडे (शास्त्री) यांची दृष्टी आता अत्यंत कमी झाली आहे. वैदिक पद्धतीने लग्न, सत्यनारायण, अभिषेक आदींवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु दृष्टी क्षीण झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा आली होती. ही बाब वर्गमित्रांना कळताच चिखली सह बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर, वाशिम, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जालना, नगर, धुळे आदी विविध भागात विखुरलेल्या सर्व मित्र- मैत्रिणींनी तातडीने मदत निधी उभारून पहाडे यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी ५१ हजार रूपयांची मदत दिली आहे. ही मदत देताना सचिन सराफ, सुनील भवर, विजय खरात, माधव मंडळकर, मनोहर भोपळे, गजानन नानोटे, गजानन वाघ, विष्णू भाला, संतोष खबुतरे, गजानन वाधवाणी, नंदकिशोर तिवारी, गायत्री खंडेलवाल आदी वर्गमित्र उपस्थित होते.
‘स्नेहमिलना’मुळे वर्गमित्राला मिळाली नवी दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:23 AM