बुलडाणा - स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे सर्वश्रुत आहे. त्याचसोबत वडिलांचं प्रेमही आईच्या प्रेमापेक्षा कमी नसतं. म्हणूनच वडिल गेल्यानंतर पोरकं झाल्याची, सर्वस्व गमावल्याचं दु:ख पीडित व्यक्तीला होतं. कोरोनाच्या महाभयंकर काळात अनेकांनी आपल्या जवळते नातवाईक गमावले, मित्र गमावले, काहींनी आपले आई-वडिलही गमावले. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली गावातील एका कुटुंबानेही घरातील कर्ता पुरुष गमावला. दोन मुलांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाचा मानसिक धक्काच जणू लहान मुलाला बसला. मात्र, मोठ्या मुलाने वडिलमाया जपत लहान भावासाठी चक्क वडिलांनाच घरात आणलं.
बंधूप्रेम व पितृप्रेमाचे एक अनोखे उदाहरण चिखलीतून समोर आले आहे. चिखली परिसरात या दोन भावांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत आहे. वडिलांचा दीड वर्षांपूर्वी कोरोनामध्ये निधन झाले होते. निधनानंतर त्यांच्या विरहाने मानसिकदृष्ट्या खचलेल्या धाकट्या भावाला सावरण्यासाठी थोरल्या भावाने वडिलांचा हूबेहुब दिसणारा मेनाचा पुतळा भावाच्या वाढदिवसाला म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी भेट दिला. चिखली येथील दिपक विनकर हे ग्रामीण भागातील एका खाजगी शाळेत शिक्षक होते. कोरोना महामारीच्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे.
दिपक यांचा थोरला मुलगा शुभम हा डिटीएड चे शिक्षण घेत आहे. तर धाकटा सुमित हा आठवीच्या वर्गात शिकत आहे. वडिलांच्या निधनामुळे सुमितला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊन तो एकटाच बसत होता. बारक्या भावाचे हे वागणे कुटूंबियांची काळजी वाढवणारे होते. त्यामुळे, सुमितला अशा मानसिकतेतून सावरण्यासाठी शुभमने एक उपाय शोधला. त्याने जयपूर (राजस्थान) येथून वडिलांचा मेनाचा पुतळा तयार करवून आणला. तो पुतळा सुमितला त्याच्या वाढदिवसादिवशी भेट देत बंधूप्रेमासोबतच पितृप्रेमही व्यक्त केले.
दरम्यान, वडिलांची हूबेहूब प्रतिकृती पाहून आणि थोरल्या भावाचे प्रेम, त्याने भेट दिलेला पुतळा पाहून सुमितला वडील आपल्यात असल्यासारखेच वाटत आहे. या दोन्ही भावांनी घरातील खुर्चीवर वडिलांचा हा पुतळा बसवला असून दोघांनीही वडिलांच्या पायाजवळ बसून आपलं प्रेम व्यक्त केलंय. सध्या या दोन्ही भावांच्या बंधुप्रेमाची, बापलेकाच्या प्रेमाची चर्चा होत असून त्यांचे वडिलांसमवेतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.