हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १ ते ७ जुलै दरम्यान वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रशासनाच्या अनेक यंत्रणांनी भाग घेतला होता. त्यात सामाजिक वनीकरण विभागाने आघाडी मिळवली असून, ११३ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.जिल्ह्यात मागिल काही वर्षांपासून सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे कोरडा किंवा ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात फरक पडत आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी शासनाने ४ कोटी वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे १ ते ७ जुलै दरम्यान जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या वृक्ष लागवड मोहिमेत तालुक्यातील ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक कार्यालये, महसूल विभाग, बांधकाम विभाग, शासकीय दवाखाने यांच्याकडूनही वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड मोकळ्या जागेत, रस्त्याच्या दुतर्फा, जलयुक्त शिवारच्या बांधावर करण्यात आली. जिल्ह्यात यावर्षी प्रशासनाच्या विविध यंत्रणा सहभागी झाल्यामुळे ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी सामाजिक वनीकरण विभागाला १ लाख २८ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात बुलडाणा तालुक्याला १० हजार, चिखली तालुक्याला १० हजार, मेहकर तालुक्याला १० हजार २००, लोणार तालुक्याला ७ हजार २००, देऊळगाव राजा तालुक्यात १० हजार २००, सिंदखेडराजा तालुक्यात १० हजार ६००, खामगाव तालुक्याला १३ हजार, शेगाव तालुक्याला ८ हजार, मोताळा तालुक्याला ११ हजार ८००, मलकापूर तालुक्याला १७ हजार, संग्रामपूर तालुक्याला १० हजार अशा प्रकारे सामाजिक वनीकरणाद्वारे १२ तालुक्याला १ लाख २८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे १ लाख ४५ हजार १०० वृक्ष लागवड करून सामाजिक वनीकरणाने ११३ टक्के उद्दिष्ट साध्य करून वृक्षारोपण मोहिमेत आघाडी घेतली आहे. मोहिमेत ४ हजार ४९७ मजुरांचा सहभागसामाजिक वनीकरणाद्वारे करण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअर्तंगत ४ हजार ४९७ मजुरांनी सहभाग घेतला. त्यात बुलडाणा तालुका ५०५, चिखली ३४५, मेहकर ३७५, लोणार २९८, देऊळगाव राजा २१४, देऊळगाव राजा ४३५, मोताळा ५०६, मलकापूर २२५, नांदूरा २०५, खामगाव ३२५, शेगाव २२६, जळगाव जामोद ३८२ व संग्रामपूर तालुक्यात ४५० अशा प्रकारे एकूण ४ हजार ४९७ मजुरांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेमुळे अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून, वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मजुरांनी सहभाग घेतला.
वृक्षारोपणात सामाजिक वनीकरणाची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:00 AM