- ओमप्रकाश देवकर
मेहकर : खरिप हंगामासाठी बियाणे कसे वापरायचे, त्याची उगवण क्षमता कशी काढायची, बिजप्रक्रीया कशी व कोणती करायची याबद्दल शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी मेहकर कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. सोशल मिडियाचा वापर करीत शेतकºयांना खरीप हंगामाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. चार ते पाच वर्षापासून शेतकरी पावसातील खंड, सोयाबीनवरील खोडमाशी, चक्रीभुंगा, कपाशीवरील बोंडअळी,बियाण्यातील भेसळ यामुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे यावर्षी शेतकरी काळजी घेत आहे. सोयाबीनचे बियाणे घरचेच वापरणार असून कृषी विभागाच्या मार्गदशर्नाने बिजप्रक्रिया करणार आहेत. सोयाबिन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण घरी साठवून ठेवलेले बियाणे ओले झालेले असेल, एकावर एक असे अनेक पोत्यांची थप्पी लावलेली असेल, जास्त उन्हात साठवणूक केली असेल तर अशा बियाण्यांची उगवण क्षमता कमी होते. याकरीता बियाण्याची उगवण क्षमता तपासून, बिजप्रक्रीया करुनच व ९० मिलीमीटर पाऊस पडाल्यावरच पेरणी करणे आवश्यक आहे.
अशी करा उगवण क्षमता चाचणी
पेरणीसाठी वापरायचे बियाणे त्यातील समप्रमाणातील शंभर दाणे निवडून एक बाय एक फुटाच्या ओल्या गोणपाटावर रांगेत टाकावे. ओला गोलपाट गुंडाळून ठेवावा. त्यावर चार दिवस हलके पाणी मारावे. पाचव्या दिवशी उगविलेले दाणे मोजून घ्यावे व सत्तर टक्के उगवण असल्यास बियाणे पेरणीस योग्य समजावे. ..
सोयाबीन बियाण्याला पेरणी अगोदर रासायनिक, जैविक नंतर बुरशीनाशक या प्रमाणात बिजप्रक्रीया करुनच पेरणी करावी. सोयाबिनला कार्बेन्डाझीयम, रायझोबियम जपोनिकम, पीएसबी, ट्रायकोडर्मा आदीची बिजप्रक्रिया करावी.
- सत्येंद्र चिंतलवाड तालुका कृषी अधिकारी, मेहकर