जालना-खामगाव महामार्गावरून जात असताना कपिल खेडेकर यांना एक मृतदेह दिसला असता त्यांनी तेथे जात सदर प्रेत रस्त्याच्या बाजूला घेऊन उपस्थितांमध्ये चौकशी केली; मात्र, मयत व्यक्तीविषयी माहिती मिळाली नाही. दरम्यान, खेडेकर यांनी या ठिकाणी इतर सहकाऱ्यांना बोलवून घेतल्यानंतर रुग्णवाहिका व पोलीस प्रशासनास याबाबत माहिती दिली. मात्र, बराच वेळ उलटूनही कोणीच वेळेवर येत नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच प्रेताला चिताग्नी देण्याचा पवित्रा घेतला होता. सोबतच आपला रोष व्यक्त करीत रास्ता रोकोदेखील केला. दरम्यान, मयत व्यक्तीला सरकारी दवाखान्यापर्यंत न्यायला एकही गाडी तयार होत नसल्याने कपिल खेडेकर यांनी स्वत:च्या चारचाकी गाडीत सदरचा मृतदेह सरकारी दवाखान्यात पोहचविला. पोलिस चौकशीत सदर मृत इसम डोड्रा येथील संतोष परिहार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाअंती नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. याकामी खेडेकर यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे, नितीन राजपूत, आशिष महाडिक, बंटी लोखंडे, नगरसेवक दत्ता सुसर, मंगेश ठेंग, सुनील धंदर, अनिल वाकोडे यांनी पुढाकार घेतला होता.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने मृतदेहाची विटंबना टळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:25 AM