लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानासह इतर प्रलंबित मागण्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट राज्य ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी २३ डिसेंबर रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त, नियोजन मंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील ग्रंथालय चळवळीतील अडचणी आणि समस्यांबाबत निवेदन दिले व सखोल चर्चा केली. राज्यातील ग्रंथालयाच्या अनुदानाच्या बाबतीत होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रंथालयातील कर्मचारी बांधवांना आर्थिक अडचणीबाबतीत त्यांना अवगत करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी लवकरात लवकर हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन ग्रंथालयांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रामेश्वर पवार, प्रमुख कार्यवाह डॉ.गजानन कोटेवार, जिल्हा ग्रंथालय संघ पुणे कार्याध्यक्ष सोपानराव पवार, बुलडाणा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ नियामक मंडळ सदस्य सुनील वायाळ यांची उपस्थिती होती.