चिखली : शहरातील संत रविदास नगरमधील रहिवासी विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असून सुमारे ३० वर्षांचा कालावधी उलटूनही हा भाग अद्यापही मुलभूत सुविधांपासून दूर असल्याचा आरोप करीत या नगरातील सर्व समस्या तातडीने सोडवा अन्यथा उपोषणास बसू असा इशारा छोटू कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे न.प. प्रशासनाला दिला आहे.
चिखली नगरपरिषदेच्या सुधारित मंजूर विकास योजना आराखड्यात शेत सर्व्हे ९८ मधील आरक्षण क्र. ७२ व १७, शेत सर्व्हे क्रमांक ९८ वर अनुक्रमे मुलांचे वसतिगृह व शासकीय निवासस्थानांचा जागेवरील आरक्षण वगळून स्थानिक रहिवाशांना घरकूल रस्ते, नाले, व इतर मुलभूत सुविधा प्रदान करण्यात याव्या तसेच एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास अंतर्गत तसेच पंतप्रधान घरकूल आवास योजनेंतर्गत या भागातील नागरिकांना त्वरित घरकूल योजनेचा लाभ देण्यात याव्या, वार्डात असलेल्या जलकुंभाचे संत शिरोमणी श्री रविदास महाराज जलकुंभ असे नामकरण करण्यात यावे, तसेच मांतगपुरा भागातील व पोलीस लाईनला लागून असलेल्या रहिवाशांना घरकूल, रस्ते, नाले व मुलभूत सुविधा तत्काळ प्रदान करण्यात याव्या आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून १५ दिवसांच्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास लोकशाहीमार्गाने आमरण उपोषणचा इशारा छोटू कांबळे यांनी दिला आहे.