ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडवा; वरवट बकाल येथे काँग्रेसचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 04:27 PM2019-08-17T16:27:44+5:302019-08-17T16:28:02+5:30
शनिवारी वरवट बकाल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांनी डफडे बजाओ आंदोलन केले.
वरवट बकाल : येथील ग्रामीण रूग्णालयातील समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी १५ आॅगस्ट पासून वरवट बकाल येथे उपोषण सुरू केले. दरम्यान याच मागणीसाठी शनिवारी वरवट बकाल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांनी डफडे बजाओ आंदोलन केले. भाऊ भोजने यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांना निवेदन दिले होते.
आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे ग्रामीण रुग्णालय असून येथे मंजूर २७ पैकी १२ पदे रिक्त आहेत. गत अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नाहीत. रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात गवत वाढल्याने साप, विंचूसह विषारी कीटकांचा वावर वाढला आहे. रुग्ण कल्याण समितीची बैठक नाही. एक्सरे मशीन धूळखात आहे. २०१५ मिळालेला लाखो रूपयांचा निधी पडून आहे. औषध निर्माता नाही. ह्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी भोजने यांनी केली होती. १४ आॅगस्टपर्यंत समस्या न सोडविल्यास १५ आॅगस्ट पासून वरवट बकाल येथील बस स्थानकावर उपोषण करण्याचा इशारा भोजने यांनी दिला होत. गत ३ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई, रयत क्रांती आदी राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. शनिवारी सकाळी अभय मारोडे व कार्यकर्त्यांनी उपोषण मंडपात रक्तदान केले. संग्रामपूर तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेस पदाधिकाºयांनी शासनाविरुद्ध नारे देत डफडे बजाव आंदोलन केले. यावेळी कॉग्रेसनेते रमेशचन्द्र घोलप, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, कॉग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे, नारायण ढगे, अभय मारोडे, संतोष राजनकार, राजेस्वर देशमुख, संजय ढगे, संतोष टाकळकार, शेख मोहंमद, शेख अशपाक, मोहन रोंदंळे, ज्ञानदेव घायल, राजू राठोड, दुर्गासिंग सोळंके, प्रल्हाद दातार आदी डफडे बजाओ आंदोलनात सहभागी झाले.(वार्ताहर)