किशोर मापारी
लोणार : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये काही ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात यश आले तर काही ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले आहे. त्यामुळे कही खुशी कही गमची स्थिती तालुक्यात हाेती.
तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची निवडणूक रंगली हाेती. सोमवारी निवडणुकीच्या निकालानंतर उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
१८ जानेवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान, निवडणूक निकाल ऐकण्यासाठी लोणार तहसील कार्यालय परिसरात सकाळपासून विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या हिरडव, बीबी, किनगाव जट्टू, पांग्रा डोळे, हत्ता यांच्यात ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. ७ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या हत्ता ग्रामपंचायतमध्ये आजवर विनोद गावंडे यांच्यासह सहकारी विचारांचे प्राबल्य राहिलेले आहे. त्यांना आव्हान देत राजकारणात उतरलेले राजेश इंगळे यांनी हत्ता ग्रामपंचायत निवडणुकीत जातीने लक्ष घालत विनोद गावंडे यांच्या राजकारणाला शह देत पॅनल उभे केल्याची चर्चा होती. राजकरणात एक-एक पाऊल पुढे टाकत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य राजेश इंगळे यांच्या पॅनलचे ५ उमेदवार निवडून आले तर विनोद गावंडे यांचे दोन उमेदवार निवडून आले. विनोद गावंडे सह एक उमेदवार निवडून आले असून इतर उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे हत्ता गावात एका नव्या राजकारणाला सुरुवात झाली असेच म्हणावे लागेल. या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना मतदारांनी नाकारलेले दिसून आले. आपला विजय होणार यावर ठाम असलेल्या जुन्या गावपुढा-यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीच्या निकालावरून नवयुवकांना, उमेदवारांना संधी देण्यास मतदार पुढे येत असल्याचे सूतोवाच स्पष्ट होत आहे.