बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशनच्या वाहनाला ट्रॅक्टरने धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी सुंदरखेड नजीक घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून वाहनांचे नुकसान झाले.सोनाळा पोलिस स्टेशनच्या एम-एच-२८-सी-६४९६ क्रमांकाच्या वाहनाची सर्व्हिसिंग करण्यासाठी चालक दिलीप राजे बुलडाणा येथे येत होते. दरम्यान समोरुन येणाºया एम-एच-२८-एजे- ३४६७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने पोलिस वाहनाला धडक दिली. कोलवड येथील चालक मुरलीधर श्रीधर जाधव हे ट्रॅक्टर घेऊन चारा आणण्यासाठी डोंगरखंडाळा येथे जात होते. सुंदरखेडनजीक या ट्रॅक्टरने पोलिस वाहनाला धडक दिली. या अपघातात चालक दिलीप राजे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर ट्रॅक्टर चालकही जखमी असून खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्याची माहिती मिळाली. वृत्त लिहेपर्यंत याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
सोनाळा पोलिसांच्या वाहनाला ट्रॅक्टरची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:32 IST