लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांचा सल्ला ऐकल्यानंतर भयभीत झालेल्या पिडीतेने आपल्यावर अत्याचार झाल्याची हकीकत नातेवाईकांना सांगितली. त्याअनुषंगाने शहरातील दाळफैल भागातील एका युवकाविरोधात विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये शिवाजी नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका १७ वर्षीय युवतीच्या नातेवाईक महिलेले दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, अपेडीक्सचा त्रास आणि पोटात दुखत असल्याने युवतीला शहरातील एका खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला. त्यानुसार सोनोग्राफीची तयारी सुरू असताना, आपल्यावर लग्नाचे आमीष दाखवून परिसरातील एका २३ वर्षीय युवकाने १ मे २०२२ ते २८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सतत लैगिक अत्याचार केल्याची कबुली आपल्याकडे दिली. सततच्या लैंगिक अत्याचारामुळे पिडीता गर्भवती असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यानुसार अत्याचार करणाºया २३ वर्षीय युवका विरोधात भादंवि कलम ३७६, ३७६ (२), (एन), सहकलम ४, ६, बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.