राज्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाने कठोर निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कामगार, नोकरदार, छोठेमोठे व्यावसायिक आपापल्या गावी आले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हे गावी आलेले नागरिक पुन्हा कामाच्या ठिकाणी परत जाऊ लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. यामुळे काम सुरू असले तरी काळजी मात्र कायम आहे.
परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी गेले
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून परदेशात शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, फिलिपिन्स आदी देशात महाराष्ट्रातून विद्यार्थी गेले आहेत. जाण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या-त्यांच्या जिल्हा, शहर प्रशासनाच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली आहे.
सर्वाधिक स्थलांतर पुणे, औरंगाबादकडे
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगारासाठी पुन्हा स्थलांतर होऊ लागले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद शहराकडे सर्वात जास्त स्थलांतर होत आहे. त्याखालोखाल मुंबई, नंतर नाशिक आणि नागपूर या शहरांत मोठ्या संख्येने कामगार पुन्हा परतू लागले आहेत.
मुले मोठ्या शहरांमध्ये; चिंता पालकांना
मी मूळचा बोरी अडगाव आहे. माझी नोकरी पुणे येथे आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात कंपनीने वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी गावी आलो आणि तिथूनच जवळपास यंदाच्या मार्च, जूनपर्यंत काम केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कंपनीने कामावर परत येण्यास सांगितले आहे. जूनमध्ये पुणे येथून परतलो, कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी तो गेलेला नाही. त्यामुळे कुटुंब थोडे काळजीत आहे, पण संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत काम सुरू आहे. यामुळेच आतापर्यंत कोरोनापासून दूर राहता आले.
- मोरेश्वर पाटील, नोकरदार
माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीतील एका चांगल्या पदावर काम करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाल्याने दिवसागणिक काळजी वाढत होती. यामुळे आम्ही त्याला घरी येण्यास सांगितले. तरी काही दिवस तो तेथेच राहिला, मात्र कंपनीनेच वर्क फ्रॉम होमला मुभा दिली. यानंतर तो घरी आला आणि जूनपर्यंत घरूनच काम सुरू होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने कंपनीचे बाेलावणे आल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात तो पुन्हा मुंबईत गेला आहे. आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असल्याने काळजी वाटत आहे.
- नंदाबाई सुरवाडे, गृहिणी