- विश्वनाथ पुरकरनरवेल: पूर्णा नदी काठी २७ एप्रिल रोजी ठराविक लोकांच्या उपस्थितीत लग्न लागल्यानंतर नवरी नवरदेवाच्या घरी आली. त्यानंतर सायंकाळी शौचास जात असल्याचे सांगून नवरी व तिच्यासोबत आलेली महिला पळून गेल्याची घटना नरवेल येथे घडली.
नरवेल येथील मुलाला गावातीलच काही लोकांनी लग्न करण्यासाठी मुलगी दाखवली. त्याबदल्यात मुलाकडून काही ठराविक रक्कम घेतली. मुलानेही ठरल्याप्रमाणे रक्कम दिली. त्यानंतर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम उरकून लग्नाचा दिवस, तारीख, वेळ ठरविण्यात आली. ठरल्यानंतर २७ एप्रिल रोजी मंगळवारला पूर्णा नदी काठी एका मंदिरामध्ये गावातीलच अल्प लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नसोहळा पार पडला. लग्न लागल्यावर नवरदेव, नवरी आणि नवरीसोबत एक महिला नवरदेवाच्या घरी आले. त्यानंतर एक तास थांबताच नवरीने संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान शौचास जात असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे नवरी, तिच्यासोबत असलेली महिला तसेच त्यांच्यासोबत गावातील एक महिला गेली. त्यानंतर चालक आॅटोरिक्षा घेवून गावाबाहेर आला. नवरी आणि तिच्यासोबत असलेली महिला आँटोमध्ये बसले. त्यांनी त्यांच्यासोबतच असलेल्या गावातील महिलेलासुद्धा बळजबरीने आँटोमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु गावातील महिलेने सतर्कततता बाळगुन आणि हाताला झटका देऊन पळत घरी आली. घरच्या लोकांना घडलेली हकीकत सांगताच गावातील तसेच घरचे मंडळींनी दुचाकी घेऊन मुक्ताईनगरपर्यंत पाठलाग करून नवरीचा शोध घेतला. मात्र, पसार झालेली नवरी सापडली नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना तसेच खाली हात परत यावे लागले. लग्न जुळून दिलेल्या दलालांना मुलाकडून काही ठराविक रक्कम दिलेली आहे. ही रक्कम गेली आणि नवरी सुद्धा गेल्यामुळे या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला. वृत्त लिहपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिस स्टेशनला केलेली नव्हती. मुलाकडून पैसे घेवून त्याची फसवणूक करणारे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता आहे.