लोणार : ग्रामीण रुग्णालयात गत पाच दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प झाले हाेते़ ६ मे राेजी काेविशिल्ड व काेव्हॅक्सिनचे ४०० डाेस उपलब्ध हाेताच नागरिकांनी एकच गर्दी केली हाेती़ ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असताना कोविड लसीकरण लसींचा तुटवडा असल्याने मागील पाच दिवसांपासून लसीकरण ठप्प झाले हाेते़ लसीकरण सुरू होताच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ग्रामीण रुग्णालयाचा नियोजनशून्य कारभार असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हाेता़ त्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. वयोवृद्धासह महिलांना ताटकळत बसावे लागले. ग्रामीण रुग्णालयासमोर हातासाठी सॅनिटायझर नाही. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे़ नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन हाेत असल्याने काेराेना संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़ लाेणार शहरासह तालुक्यात वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे़