लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी ठरू शकते. त्यासाठी त्यांच्या जीवनचरित्रावर वेब सिरीज तयार करण्यासाठी आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडून निधी मिळण्यासाठी शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागणी मंजूर केल्याने वेब सिरीजची निर्मिती लवकरच होणार आहे. वेब सिरीजला निधी मिळण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांना वेब सिरीजसाठी निधीची मागणी केली. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेब सिरीज येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या शिष्टमंडळात आचार्य वेरूळकर गुरुजी, भास्करराव विघे, गव्हाळे महाराज, अरविंद काळमेघ, डॉ. नरेंद्र तरार, रवि डावले, रामेश्वरजी बघरट, राजदत्त मायालू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.श्री संत तुकडोजी महाराज प्रचार व प्रशिक्षण संस्था, दासटेकडी, गुरुकुंज मोझरी ही संस्था अनेक दिवसांपासून राष्ट्रसंतांवर चित्रपट व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. विदर्भातील जवळपास ३६ आमदार तसेच खसदारांनी या मागणीचे पत्र राज्य शासनाला दिले आहे. नवीन पिढीपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचावेत, यासाठी चित्रपटापेक्षा वेब सिरीजला जास्त प्रतिसाद मिळेल, असे बैठकीत पुढे आले. त्यामुळे सिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भेटीमुळे त्यास आता चालना मिळणार आहे.
तुकडोजी महाराजांवर लवकरच वेब सिरीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:02 PM