आ.श्वेता महालेंची ना.भुजबळांकडे मागणी
चिखली : जिल्ह्यातील ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या ज्वारी आणि मक्याचे थकीत चुकारे तातडीने देण्याची मागणी आमदार श्वेता महाले-पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील रब्बी हंगामातील ज्वारी व मक्याची आधारभूत किमतीने शासनाने खरेदी करताना १७७५ शेतकऱ्यांकडून ३१७१६ क्विंटल ज्वारी, तर १९३ शेतकऱ्यांकडून ८५४७ क्विंटल मका खरेदी केला आहे; परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या मका व ज्वारीचे चुकारे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ज्वारी व मका उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ज्वारीच्या चुकाऱ्यापोटी ८ कोटी १० लाख रुपयांपैकी केवळ एक कोटी १९ लाख १५ हजार ६८१ रुपयांचे २५० शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत वाटप झाले आहे; तर मकाच्या चुकाऱ्यापोटी १ कोटी ५८ लक्ष रुपयांपैकी केवळ २२ शेतकऱ्यांना २३ लाख ४० हजार २५० रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत. ही बाब आमदार श्वेता महाले यांनी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील ज्वारीसाठी एकूण ५९१२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी केवळ २१६८ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले; तर ३७४४ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आलेले नाहीत. तसेच ८९१७ शेतकऱ्यांनी मक्यासाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ५८०९ शेतकऱ्यांनाच संदेश पाठविण्यात आले. ३१०८ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले नाहीत. यामुळे ज्वारीसाठी ३७४४, तर मक्यासाठी ३१०८ शेतकऱ्यांची मका खरेदी झाली नाही. पर्यायाने या शेतकऱ्यांना त्यांचा माल मातीमोल किमतीने खुल्या बाजारात विकावा लागला आहे. या शेतकऱ्यांना फरकाची रक्कम देण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचे थकीत चुकारे तातडीने देण्यात यावेत; अन्यथा लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही आमदार महाले यांनी या पत्राद्वारे दिला आहे.