बुलडाणा : जून महिन्यानंतर पावसाने दीड महिना दडी मारली तरी जिल्ह्यात ८९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र तब्बल दोन महिने पाऊस नसल्यामुळे बरेच क्षेत्र नापेर राहिले, तर काही शेतकर्यांनी पेरणी क्षेत्रात मोड म्हणजेच पेरलेले शेत वखरून टाकले. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २ लाख ५२ हजार हेक्टरवर दुबार पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. कृषी विभागाने यंदा ७ लाख ४८ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. त्यापैकी ७ ऑगस्टपर्यत ६ लाख ६३ हजार म्हणजे ८९ टक्के पेरणी पूर्ण केली; मात्र मे महिन्याचा शेवटचा आठवडा सोडला, तर पुढे जून व जुलै पावसाने कायमस्वरूपी दडी मारली. पावसाआभावी काही ठिकाणी बियाणे उगवलीच नाही, तर बर्याच ठिकाणी लहान पिके कोमेजून सुकून गेल्यामुळे हताश झालेल्या शेतकर्यांनी आपल्या शेतात नांगर फिरवून पिके वखरून काढली. काही गावांतील निराश झालेल्या काही शेतकर्यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर जनावरे चरण्यास सोडली. यामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी पिकांची मोड होणारे संभाव्य क्षेत्र १ लाख ९३ हजार ४१६ हेक्टर निर्माण झाले आहे. त्यामुळे या मोड होणार्या पिक पेरणी क्षेत्रापैकी दुबार पेरणीचे संकट १ लाख ७१ हजार ४५९ हेक्टरवर निर्माण होणाची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात पहिल्याच आठवड्यात पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरसरीपेक्षा जास्त पाऊस झाला. बर्याच ठिकाणी पूर आणि अतवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. आधी पावसाने मारलेली दडी व नंतर अतवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानंतर आता शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, कृषी विभागाकडून जिल्ह्यातील संभाव्य दुबार पेरणी होणारे क्षेत्र २ लाख ५२ हजार ८४७ हेक्टर एवढे वर्तविण्यात आले आहे.
अडीच लाख हेक्टरवर दुबार पेरणी
By admin | Published: August 11, 2015 12:08 AM