चिखली : सद्यस्थितीत सर्वत्र ट्रॅक्टरद्वारे शेतीची पेरणी करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना होणाऱ्या छोट्या-छोट्या चुकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते़ शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेती मशागत व पेरणीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना कृषी विभागाने योग्य प्रशिक्षण देत पेरणीचे धडे दिले आहे.
कृषी विभागाच्या वतीने २१ मे रोजी तालुक्यात ट्रॅक्टर चालक व मालकांचे प्रशिक्षण मोहीम स्वरूपात राबविण्यात आले. पेरणी करताना ट्रॅक्टर चालकांकडून पेरणी यंत्र व्यवस्थित ‘कॅलिब्रेशन’ न करता ट्रॅक्टर चालवताना हवी ती काळजी न घेता पेरणी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बियाणे उगवण व बियाणे पातळ होणे या समस्या उद्भवतात, पर्यायाने उत्पन्नात घट होते. यावर मात करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी तालुक्यात मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांनी गावपातळीवर याबाबत प्रशिक्षण घेतले. ही मोहीम अंतर्गत विजय बेतीवार कृषी उपसंचालक बुलडाणा यांनी कोलारा येथे तर अमोल शिंदे तालुका कृषी अधिकारी चिखली यांनी एकलारा येथे उपस्थित राहून मार्गदर्शन केले. एकलारा येथे सदर कार्यक्रमास लक्ष्मण अंभोरे, सरपंच, ट्रॅक्टर चालक, मालक व शेतकरी उपस्थित होते.
ही घ्यावी काळजी
सोयाबीन बियाणे ३ ते ५ सेंटिमीटर खोलीवरच पेरावे, त्यापेक्षा खोल पेरल्यास बियाणे उगवण होत नाही अथवा कमी होते़ ट्रॅक्टर वेग हा तासी ५ किमीपेक्षा जास्त ठेवू नये, पेरणी यंत्राचे पेरणीपूर्वी कॅलिब्रेशन करूनच पेरणी करावी, ट्रॅक्टर दुसऱ्या व लो गिअरवरच चालवावे, सोयाबीन बियाणे एकरी २४ ते २६ किलो पेरावे, आंतरपीक घेणार असल्यास २२ किलो प्रति एकरी बियाणे वापरावे. त्याचबरोबर ग्राम बीजोत्पादन, उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, रूंदसरी वरंबापद्धत, पट्टापद्धत, खतांचा संतुलित वापर, तूर पिकामध्ये ३०, ४५ व ६० दिवसांनी शेंडे खुडणे आदी विविध कृषी मोहिमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.