खामगाव : यावर्षीच्या खरीप हंगामास दीड महिना उलटूनही दमदार पाऊस बरसलाच नाही. आज २२ जुलैपर्यंत तालुक्यात ४५ मि.मी. पावसाची नोंद असून गत पाच वर्षातील हा निच्चांक आहे. झालेल्या पावसामुळे आतापर्यंत केवळ १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या केल्या आहेत. तर गतवर्षी १00 टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. खामगाव तालुक्याचे शहरासह १ लाख २0 हजार २२४ हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून यामधील ८४ हजार २४४ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. तालुक्यात १४५ गावात ५४ हजार ६६२ खातेदार संख्या आहे. पेरणीसाठी उपलब्ध असलेल्या क्षेत्रापैकी हलक्या प्रतीची ४0 हजार ४१६ हेक्टर, मध्यम ३0 हजार ३७१ तर उच्च प्रतीची १३ हजार ४५७ हेक्टर जमीन आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात दरवर्षीप्रमाणे पेरण्यास सुरूवात होईल या आशेने शेतकर्यांनी केलेली तयारी पावसाअभावी ठप्प पडली. मृग व आद्रा नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी पार खचला आहे. पेरणीचा दीड महिना उलटूनही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी पेरणीस धजावला नाही. आतापर्यंत तालुक्यात केवळ ४५.0४ पावसाची नोंद आहे. ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र विहिरीची पाणीपातळी खालावल्याने ते सुध्दा चिंताग्रस्त आहेत. गतवर्षी १00 टक्के पेरण्या यावेळपर्यंत आटोपल्या होत्या. परंतु पुरेशा पावसाअभावी यंदा केवळ १४ हजार १0४ हेक्टर क्षेत्रावर कपाशी, सोयाबीन, उडीद, मुग, तूर, ज्वारी तसेच इतर पिकांचा पेरा झाला आहे. अद्यापही दमदार पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा असून खरीप हंगामाचे नियोजन मात्र कोलमडले आहे.
केवळ १४ हजार हेक्टरवर पेरणी
By admin | Published: July 22, 2014 11:49 PM