लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जमीनतील ओलावा कमी झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी खोळंबली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या १० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.अतिवृष्टीने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान भरून न निघणारे आहे. अति पावसाने जमीनीत ऐवढे पाणी साचले होते, की काही शेतकऱ्यांनी मोटारपंप लाऊन आपल्या शेतातील पाणी बाहेर काढले. सध्या शेतात पाणी साचलेले दिसत नसले तरी, जमीनीत अती ओलावा असल्याने मशागतीची कामे करणे अवघड आहे. या अतिपावसाचा परिणामा सध्या रब्बी हंगामावर होत आहे. रब्बी पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर टाकल्यानंतर या पेरणीयंत्राला चिखलाचे गोळे लागातात. त्यामुळे शेतकरी पेरणी करू शकत नाहीत. बुलडाणा तालुक्यासह मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, चिखली या भागामध्ये सध्या ही समस्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या उरकत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे नियोजित क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यामध्ये गहू, हरभरा पिकाचा पेरा सर्वाधिक असतो. परंतू सध्या कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात अवघ्या १०.८० टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. १७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडे आहे. यामध्ये जमीनीत असलेला अति ओलावा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नदीपात्राच्या परिसरातील शेती निकामी!अतिवृष्टीमुळे नदीपात्राच्या परिसरातील शेती निकामी झाल्याचे दिसून येते. अनेक शेतामधील मातीच खरडून गेली आहे. जिल्ह्यातून पैनगंगासह इतर अनेक नदीपात्र वाहतात. त्या नदीपात्राच्या काठावरील शेतात खरीपाचे नुकसान झालेच; शिवाय रब्बी हंगामाची पेरणी करणेही अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीचे क्षेत्र झपाट्याने वाढत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
तालुका निहाय पेरणीजिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात १ हजार १, संग्रामपूर तालुक्यात ३५२ हेक्टर, चिखली तालुक्यात १ हजार ३६० हेक्टर, देऊळगाव राजा तालुक्यात ४ हजार ७९६ हेक्टर, सिंदखेड राजा तालुक्यात ९ हजार ९६ हेक्टर, मोताळा तालुक्यात ४३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.