- काशिनाथ मेहेञे
सिंदखेड राजा : मृग नक्षत्राच्या पावसाने मान्सूनपूर्वीच दमदार हजेरी लावल्यामुळे सिंदखेडराजासह परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. तालुक्यात २ ते ११ जून दरम्यान ७४ मीमी पाऊस पडल्याची माहिती तहसिलदार संतोष कणसे यांनी दिली. सिंदखेड राजा येथे अनेक वर्षांपासून शेतकरी धूळ पेरणी मोठ्या प्रमाणात करीत असत. परंतु निसर्गाचा लहरीपणा, बी -बियाणे, रासायनिक खतांच्या महागलेल्या किंमती यामुळे दुबार, तिबार पेरणीच्या संकटाने शेतकरी गार झाला होता. मात्र यावर्षी मान्सूनपूर्वीच मृग नक्षत्राच्या दमदार पावसाने सूरवात केली. त्यामुळे शेतकरी मशागतीला लागले आहेत. अनेक ठिकाणी कपाशी, मका, मूग, उडीद, सोयाबीनची लागवड व पेरणी करीत आहेत. कापूस, सोयाबीन, मूग, ऊडीद, हरभरा धान्याची आयात शासन मोठ्या प्रमाणात करते. शेतीमालाला मातीमोल बाजारभाव मिळून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेडनेटकडे वळले शेतकरी
माळरानावर वसलेल्या नशिराबाद गावातील शेतकºयांनी पारंपारीक शेतीऐवजी आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. मालास ऊत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव मिळत नसल्यामुळे गावातील ६० टक्के शेतकºयांनी शेड नेट शेतीचा प्रयोग राबविला. या माध्यमातून गावात आदर्श निर्माण केला. आदर्श शेतकरी दिलीप मेहेत्रे यांनी गेल्या दहा वर्षापूर्वीच शेडनेट शेतीचा प्रयोग सुरु केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ६० टक्के शेतकरी शेडनेटची शेती करुन लाखो रुपयांचा फायदा मिळवत आहेत. इतर पिकांना फाटा देऊन तांत्रिक व आधुनिक शेतीकडे कल दिसून येत आहे.
असा झाला पाऊस
सिंदखेडराजा तालुक्यात २ ते ११ जून दरम्यान ७४ मिमी पावसाची नोंद झाली. २ जुन रोजी ८ मिमी पाऊस पडला. ३ जुन रोजी २२ मिमी, ६ जुनला ११ मिमी, १० जूनला ११ मिमी, ११ जुनला २२ मिमी पाऊस पडला. तालुक्यात एकुण ७४ मिमी पाऊस पडला.