- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या १० वर्षामध्ये सोयाबीनचा पेरा झपाट्याने वाढला आहे. अनेक शेतकरी हे त्याच एकाच शेतात वारंवार सोयाबीन पीक घेत आहेत. शेतात पिकांचा फेरपालट होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाची छाया पिकांसाठी धोक्याची ठरत आहे. यावर्षी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आता सोयाबीन शेती तोट्याची होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतल्या जाते. यंदा सात लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ८४ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. परंतू सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट आल्याचे चित्र आहे. सोयाबीनच्या एकरी उत्पन्नावर नजर टाकली असता सोयाबीनसाठी आतापर्यंत लागलेला खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
पिकामध्ये फेरपालट होत नसल्याने उत्पान्नामध्ये घट येत आहे. सोयाबीनच्या शेतात दुसऱ्यावर्षी दुसरे पीक घेतले पाहिजे. - सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ.
मला एका एकरामध्ये केवळ तीन पोते सोयाबीन झाली आहे. एकरी खर्च ११ हजार रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे आतापर्यंत सोयाबीनसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. मूग, उडीद पीकही पाण्यातच गेले. - संतोष लाटे, शेतकरी.