मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील तिघ्रा येथील एका शेतकर्याच्या शेतातील सोयाबीनच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून दिल्याने एक लाख रूपयाचे नुकसान झाले. ही घटना गुरू वारी रात्री १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या तिघ्रा येथील शेतकरी मनोहर जगदेव शेळके (वय ५५) यांनी चार एकर शेतातील सोयाबीन सोंगून शेतात सुडी लावून ठेवलेली होती. लाख रूपये किमतीच्या आसपास सोयाबीनपासून उत्पादन होण्याची अपेक्षा शेळके यांना असल्यामुळे सोयाबीनच्या गंजीवर १0 हजार रुपये किमतीच्या दोन ताडपत्र्या झाकून ठेवल्या होत्या. शुक्रवारी सोयाबीन तयार करून घरी नेण्याचे त्यांचे नियोजन असतंना १७ मार्चच्या रात्रीतून अज्ञात इसमाने सोयाबीनच्या गंजीला आग लावून दिली. या आगीमध्ये संपूर्ण सोयाबीनची गंजी जळून खाक झाली. यामध्ये शेतकरी मनोहर शेळके यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यावर्षी नापिकी असून, सोयाबीनची गंजी खाक झाल्याने या शेतकर्यावर आभाळच कोसळले आहे. शेतकरी मनोहर शेळके यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.
सोयाबीन गंजीला आग
By admin | Published: March 19, 2016 12:30 AM