पान उत्पादक शेतकरी संकटात
धाड : बुलडाणा तालुक्यातील काही भागांत अनेक शेतकरी पानमळ्यांची शेती करतात. त्यामध्ये मासरूळ, धामणगाव या परिसरांत पानमळे आहेत; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे विक्री घटल्याने पान उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
कर्जमुक्तीची प्रतीक्षा कायमच
बुलडाणा : सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. पीक कर्जासाठी बँकेत गेल्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा कायमच आहे.
किराणा दुकानावर सुरक्षेकडे दुर्लक्ष
बीबी : शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना नागरिक नाहक दुकानांवर गर्दी करताना दिसून येत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून येते.
घरपोच बियाणे उपलब्ध करून द्या!
दुसरबीड : येणाऱ्या हंगामासाठी खते, बियाणे यांची सोय करून पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी येथील शेतकरी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही घरपोच बियाणे मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
शेती मशागतीच्या कामांना वेग
साखरखेर्डा : येत्या लवकरच रोहिणी नक्षत्रास सुरुवात होणार आहे. त्यामुळे परिसरात शेती मशागतीला वेग आला आहे. साखरखेर्डा गावातील शेतकरी मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला लागले आहे. नागरणी, वखरणी, शेतातील काडी कचरा वेचणी आदी कामे करण्यात येत आहेत.
बांधकाम कामगार मदतीच्या प्रतीक्षेत
बुलडाणा : लॉकडाऊनच्या काळात परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. कोरोना आजारामुळे लॉकडाऊन सुरू असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम मजुरांना रोजगार उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
जंतुनाशक फवारणीसाठी रासेयोचा पुढाकार
बुलडाणा : जिल्ह्यातील काही महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गाव परिसरात सॅनिटायझर फवारणी केली. परिसर निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करण्यात आली आहे.
उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले
डोणगाव : परिसरात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बेलगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील भुईमुगाच्या एका झाडाला १८० शेंगा लागल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. दरम्यान, या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा भुईमुगाची लागवड केली आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
रायपूर : दिवसभरात कित्येकदा वीज गुल होत असल्याने रायपूरसह परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वातावरणातील उकाड्यामुळे कुलर, पंख्यांची गरज भासते. मात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने जिवाची तगमग होते. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतमध्ये विलगीकरण कक्ष
बुलडाणा : काेरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड सेंटर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विलगीकरण कक्ष उभारण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. नागरिकांना या कक्षात ठेवून उपचार करण्यात येणार आहेत.