बुलडाणा : पावसाने दडी मारल्याने आधीच उशिरा पेरण्या झाल्याने उत्पादनात घट होणार, हे ठरलेलेचे आहे. यामध्ये आता अज्ञात रोग व किडींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खामगाव परिसरात कपाशीवर अज्ञात रोग आला असून, घाटावरील बुलडाण्यात सोयाबीनला चक्रीभुंग्याने घेरले आहे. जिल्ह्यात चार लाख बारा हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आहे. आधी पावसाने दडी मारली व आता गेल्या आठ दिवसात संततधार पाऊस सुरू झाला. यामुळे पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. आता कशीबशी पिके शेतात तग धरून उभी असताना अज्ञात रोगामुळे कपाशी लाल पडू लागली आहे.मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात चक्रीभुंग्याने सर्वाधिक नुकसान केले आहे. असाच प्रकार बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात आहे. मोताळा तालुक्यात चक्रीभुंग्याने पाय पसरायला सुरुवात केली असल्याने कपाशीवरील लाल्या अन् सोयाबीनवरील भुंग्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
सोयाबीनवर चक्रीभुंगा
By admin | Published: September 11, 2014 11:40 PM