बुलडाणा, दि. १४: वन्य प्राण्यांची शिकार करणे, विद्युत तारा लावून हत्या करणे, जनावरावरती विष प्रयोग करणे, वन्य प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी पडणे, रस्त्यावरील अपघातात ठार होणे, जखमी तडफडत मरणे, अशा बर्याच घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. अशा विविध कारणांमुळे होणार्या वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभागाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. आता यासाठी भ्रमणध्वनी नंबरही जाहीर करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात आढळणार्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ वन विभागाने विविध उपाययोजना केल्या असून, वन विभाग सज्ज आहे. याशिवाय अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, अवैध चराईचे प्रकार, वाहनाद्वारे चोरटी तोड आदी प्रकार घडू नयेत आणि वनाचे नुकसान होऊ नये, याकरिता बुलडाणा वन विभागातर्फे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या सर्व कारवायांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रानुसार अधिकार्यांची नियुक्ती करून पथक तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात गत चार वर्षांत विविध घटनेत सहा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय नीलगाय, हरीण, रानमांजर व इतर वन्य जीवांचा विविध कारणांमुळे मृत्यू होण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या निदर्शनास आल्यास संबंधित क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सहायक वनसंरक्षक यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. तसेच वनविभागाने जाहीर केलेल्या क्रमांकावर माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे, असे उपवनसंरक्षक भगत यांनी कळविले आहे.
वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ विशेष उपाय
By admin | Published: August 15, 2016 2:34 AM