ज्ञानगंगा अभयारण्यासह लगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत अलीकडील काळात वन कर्मचाऱ्यांवर अवैध चराई करणाऱ्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानगंगा अभयारण्यात या लोकांना प्रतिबंध करण्यासोबतच वन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाेबतच वन कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखणे, अवैध चराई रोखणे हे प्रमुख उद्देश हे दल तैनात करण्यामागे आहे. दरम्यान, अभयारण्याच्या परिसरात अवैधरीत्या गुरांची चराई करण्यास प्रतिबंध व्हावा, या दृष्टिकोनातून परिसरातील सर्व ग्रामपंचायती, गुरांचे मालक, गुराखी यांना अवगत करण्यात आले आहे. अवैध चराईचे प्रकार होत असल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, अशा स्वरूपाच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. यासोबतच अवैध चराईचा बीमोड करण्यासाठी खामगाव वन्यजीव व वनपरिक्षेत्र अधिकारी एम. व्ही. धंदर तथा वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. सी. लोखंडे यांनीही अशा व्यक्तींवर कारवाई करून या अवैध चराईस लगाम लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
त्यातच मधल्या काळात झालेल्या काही हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे पथक तैनात करण्यात आले आहे.
--२७ जणांचा आहे समावेश--
अभयारण्याच्या क्षेत्रात अवैध चराई करणाऱ्यांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने हे बंदूकदारी विशेष व्याघ्र संरक्षण दल कार्यरत राहणार आहे. या दलामध्ये २७ जवानांचा समावेश असून त्यांच्याकडे चार एसएलआर रायफलही देण्यात आलेल्या आहेत. अभयारण्यात अवैध चराई रोखण्यासाठी मुक्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, विभागीय वन अधिकारी निरंजन विवरेकर, सहायक वनसंरक्षक वसंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्य जीव विभागाने नियोजनबद्ध आखणी आता केली आहे.