संदीप वानखडे / बुलढाणा
साखरखेर्डा : भरधाव दुचाकी बंद पडलेल्या एसटी बसवर आदळल्याने तीनजण जागीच ठार झाले़ ही घटना चिखली ते मेहकर रस्त्यावरील वर्दडा फाट्यावर ८ ऑक्टाेबर राेजी रात्री घडली. गोपाल पंढरी सुरडकर (वय २१, रा. बेराळा), धनंजय परमेेश्वर ढेंग (२५, रा. वाघापूर) आणि सुनील सुभाष सोनुने (रा. चिखली) अशी मृतांची नावे आहेत.
लव्हाळा चौकीपासून एक किमी अंतरावर वर्दडा फाटा आहे. तेथे चिखली आगाराची बस (एमएच ०६ एस ८८१६) ही मंगळवारी, दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी बंद पडली होती. त्या बसचे दुरुस्तीचे काम कर्मचारी करीत होते. रात्री ७:३० वाजता लव्हाळा येथून गोपाल पंढरी सुरडकर, धनंजय परमेश्वर ढेंग आणि सुनील सुभाष सोनुने हे दुचाकीने चिखलीकडे चालले होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट बसवर आदळली. दुचाकीचा वेग एवढा हाेता की, तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेतली. तसेच तिन्ही मृतदेह चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
प्रवासी वाहनावर दुचाकी धडकली, दाेन गंभीरदरम्यान, अन्य एका घटनेत साखरखेर्डा येथून चिखलीकडे जात असलेल्या व्यापाऱ्यांची दुचाकी प्रवासी वाहनावर धडकली. यामध्ये दाेनजण गंभीर जखमी झाले, तर एकजण किरकाेळ जखमी झाला़ या अपघातातील जखमींना परस्पर रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची नावे कळू शकली नाहीत़