बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानामध्ये समाविष्ट केलेल्या ३३0 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यातील या गावांतील कामे त्वरेने पूर्ण करून जलयुक्त शिवार अभियानाचा निधी कालर्मयादेत खर्च करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी प्रशासनाला दिल्या. जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रमोद लहाळे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी निवाणे, कार्यकारी अभियंता स्थानिक स्तर देशमुख, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण कथने आदींसह संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानातील दुसर्या टप्प्यातील गावांमध्ये कामे सुरू करण्याचे सूचित करीत जिल्हाधिकारी म्हणाले की, या गावांमधील कामांची अंदाजपत्रके तातडीने पाठवावी, तसेच २0१६-१७ चा कृति आराखडा तयार करावा. या टप्प्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सुरू केलेली कामे पूर्ण केली पाहिजेत, अशा सूचना दिल्या. बैठकीदरम्यान प्रधानमंत्री सिंचन योजनेबाबत माहितीचा आढावाही घेण्यात आला. या योजनेकरिता माहिती तयार करण्यात येत असून, केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जलयुक्त’चा निधी वेळेत खर्च करा!
By admin | Published: March 10, 2016 2:06 AM