- ब्रम्हानंद जाधव।बुलडाणा: प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर असून त्या धर्मिक कार्यक्रमातही मागे राहिलेल्या नाहीत. गेल्या २२ वर्षापासून विना चालवण्याची परंपरा मेहकर तालुक्यातील अंत्री दे. येथील मुक्ताबाई महिला भजनी मंडळाकडून जपली जात आहे. तर यंदा प्रथमच या महिलांनी अंखड हरिनामाची ज्योत लाऊन संपूर्ण गाव भक्तीमय करून टाकले. यामध्ये सर्व नियोजन व कामकाज महिलांनी केल्याने स्त्री शक्तीचे महान कार्य पुन्हा एकदा समोर आले आहे. वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्व आहे. अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील महिलांनी अखंड हरिनामाच्या माध्यमातून गावात आध्यात्म आणि समाजप्रबोधनाची सांगड घालत चैतन्याचे वातावरण निर्माण केले. अंत्री दे. येथील महिलांनी अनेक वर्षापूर्वी मुक्ताबाई महिला भजनी मंडळ स्थापन केले. त्यानंतर गावातील हनुमान मंदिरामध्ये गेल्या २२ वर्षापासून वीणा वादन करण्यात येत आहे. हा वीणा दरवर्षी महिलांच्याच खांद्यावर राहत आहे. यंदा धार्मिक क्षेत्रातील या कार्यात आणखी वाढ करण्यासाठी मुक्ताबाई महिला भजनी मंडळाने गावात भगवद् कथा वाचन सुरू केले. २ ते ९ मे पर्यंत झालेल्या या कार्यक्रमात दररोज पारायण, हरिपाठ, हरीकीर्तन झाले. या संपुर्ण कार्यक्रमाची धुरा ही महिलांनीच सांभाळली असून, धार्मिक क्षेत्रातही या महिलांनी आपले योगदान दाखवून दिले आहे. अध्यात्मिक मार्ग दाखविणारे व्यासपीठहरिनाम सप्ताह म्हणजे वारकºयांचा महाउत्सव असून संत विचारांची प्रेरणा देण्यासाठी हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अध्यात्मिक मार्ग दाखविणारे मोठे व्यासपीठ या महिलांनी आपल्या सप्ताहामधून निर्माण केले. सतिष लक्ष्मण मिस्त्रा महाराज (रा. कळंबेश्वर) यांनी प्रवचन दिले. त्यांनी आपल्या प्रवचनातून जिल्ह्याला जिजाऊंच्या रुपाने लाभलेल्या स्त्री शौर्याचा इतिहास, महिलांचे कर्तृत्व कसे अगाध आहे हे सांगितले. मुक्ताबाई महिला भजनी मंडळाने सुरू केलेल्या वारकरी संप्रदायातील धार्मिक सामूहिक उपासनेचे महत्त्व विषद केले. समाजप्रबोधानाचे धडे त्यांनी दिले. आध्यात्माला प्रबोधनाची जोड आध्यात्म, समाजप्रबोधन आणि स्त्री शक्तीचा जागर या सप्ताहातून करण्यात आला. गावातील एकोपाही यातून दाखवून दिला. टाळ, मृदुंग, विना टाळ, मृदुंग व वीना वादन करून महिलांनीच गावातून भगवद् गीतेची मिरवणूक काढली. महिलांचा पुढाकारकेवळ महिलांच्या पुढाकारातून हा धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आला. अंत्री दे. येथील मुक्ताबाई महिला भजनी मंडळामध्ये अध्यक्ष कौशल्याबाई देशमुख, उपाध्यक्ष सुनिता देशमुख, राधा राऊत, निर्मला देशमुख, दुर्गा देशमुख, प्रमीला देशमुख, हावसाबाई देशमुख, शारदा देशमुख, सुवर्णा देशमुख, कोमल देशमुख, मिना देशमुख, उषा देशमुख, रेखा देशमुख व अनेक महिलांचा सहभाग आहे.
अखंड हरिनामाच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची सांगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 6:25 PM