कोविड विषाणूच्या प्रादुर्भावावर राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून, या उपाययोजनांमध्ये राज्यातील अनेक जण स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. यानुषंगाने मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९) साठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले आहे. यामध्ये सर्व उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक स्थळे राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व नागरिकांनी 'मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-१९)' या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. याची दखल घेत कोविड विरुद्धच्या या युद्धात आपलाही खारीचा वाटा असावा, या उदात्त हेतूने स्थानिक तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दोन दिवसांचे तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत म्हणून दिले आहे. दरम्यान, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातून जमा केलेल्या १ लाख ३६ हजार ८९८ रुपयांचा धनादेश शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला यांच्या हस्ते तहसीलदार अजितकुमार येळे यांच्याकडे २४ जून रोजी सुपूर्द केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे, अधीक्षक मिलिंद देशपांडे यांची उपस्थिती होती. शिप्रमंच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा निधी स्वेच्छेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला असून, या माध्यमातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबाबत सर्वच स्तरावरून स्वागत होत आहे.
एसपीएमच्या प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिले दाेन दिवसांचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:24 AM