लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या गत आठ दिवसांपासून वाढीस लागली होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनलॉकमध्ये देण्यात आलेली शिथिलता कमी करण्यात आली. तसेच शुक्रवार १० ते रविवार १२ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत जनता संचारबंदीचे आवाहन करण्यात आले. या संचारबंदीला खामगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवारी भाजीपाला विक्री, किराणा व्यावसायिकांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाणे बदं ठेवून जनता कर्फ्यू यशस्वी केला आहे.गत काही दिवसांपासून शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांसह प्रतिष्ठित नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खामगाव शहराची कोरोना हॉटस्पॉट केंद्राकडे होत असलेली वाटचाल लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाकडून ७ ते २१ जुलै कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामध्ये अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना सकाळी ९ ते ३ या कालावधीत सूट देण्यात आली.दरम्यान, खामगाव शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत असल्याने, भाजपच्यावतीने १० ते १२ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत जनता संचारबंदीचे आवाहन करण्यात आले. शुक्रवारी खामगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यामध्ये अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बंद होती. कापड आणि मोबाईल विक्रेता असोसिएशनने गुरूवारीच या बंदला प्रतिसाद जाहीर केला आहे.
खामगावात जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:41 PM