जिल्हास्तरीय ऑनलाइन युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, रवींद्र धारपवार क्रीडा अधिकारी, रविकिरण टाकळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक प्रशांत खाचणे, प्रा. सुभाष मोरे, कैलास कोल्हे, टिळक क्षीरसागर, प्रा. किरण टाकळकर उपस्थित होते. शासनाच्या सूचनेनुसार बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. युवा महोत्सवामध्ये लोकगीत, तबला, मृदुंग,बासरी, हार्मोनियम, वक्तृत्व व शास्त्रीय गायनामध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंतिम निकाल परीक्षकांनी सादर केल्यानुसार तबला या बाबीमध्ये शरद मधुकर चुकेवार याने, बासरी -ओंकार शरद कुळकर्णी, मृदुंग अविनाश गजानन तळेकर, हार्मोनियम चंद्रशेखर कैलास कोल्हे, वक्तृत्व अनुराधा गजानन सपकाळ, शास्त्रीय गायन शरद मधुकर चुकेवार तसेच लोकगीत ज्ञानेश्वरी पोले, साक्ष अवचार, अंकिता अवचार, नम्रता लेंडे, कोमल काळे, योगीता थुटे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धकांची विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय युवा महोत्सवासाठी निवड झालेली आहे. विभागीय युवा महोत्सव सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना लिंक प्राप्त झाल्यानंतर त्यांना सादरीकरण करावे लागेल.
ऑनलाइन युवा महोत्सवाला परीक्षक म्हणून टिळक क्षीरसागर, रवीकिरण टाकळकर, प्रशांत खाचणे, कैलास कोल्हे, प्रा.सुभाष मोरे, प्रा. किरण टाकळकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संयोजक अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक, रवींद्र धारपवार क्रीडा अधिकारी, विजय बोदडे वरिष्ठ लिपीक, किरण लहाने कनिष्ठ लिपीक, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, गणेश डोंगरदिवे, कृष्णा नरोटे यांनी परिश्रम घेतले.