खामगाव (जि. बुलडाणा): क्रीडापटूंनी विविध खेळ खेळताना खिलाडू वृत्ती जोपासली पाहिजे. खेळ हे आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अंग असून, त्याच्या माध्यमातून आपल्या विकासाला गती मिळते. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर खेळांच्या विकासाला चालना मिळत आहे. क्रीडापटूंनी जिद्द, चिकाटी व आपल्या कौशल्याच्या जोरावर उत्कृष्ट प्रदर्शन करीत आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन दिलीपकुमार सानंदा यांनी केले. खामगाव तालुक्यातील ग्राम बोरजवळा येथे आयोजित राणा चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी सानंदा रविवारी बोलत होते. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर, बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरे होते. मागील १८ फेब्रुवारीपासून बोरजवळा येथे क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५१ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना बोराखेडी येथील ग्रीन शायर विरुद्ध पिंपळगाव राजा येथील एलेवन स्टार या संघांदरम्यान झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात ग्रीन शायरने एलेवन स्टार संघाचा पराभव केला. विजेत्या संघाला प्रथम बक्षीस ९00१ रुपये, तर एलेवन स्टार संघाला ७00१ रुपये द्वितीय बक्षीस आणि तृतीय बक्षीस ५00१ रुपये बोरजवळा येथील महाराणा क्रिकेट क्लबला दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून रफिकभाई, उ त्कृष्ट गोलंदाज म्हणून राजीकभाई, तर उत्कृष्ट कर्णधार म्हणून अभिजित तोमर यांचाही बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
क्रीडापटूंनी खिलाडू वृत्ती जोपासावी - सानंदा
By admin | Published: March 24, 2015 1:04 AM