लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्हा मुख्यालयात तीन रुग्ण आढळले असताना बुलडाणा पालिकेकडून सोडीयम हायफोक्लोराईड फवारणीसोबतच फिनाईलचीही फवारणी करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे.विशेष म्हणजे फिनाईल फवारणी केल्यास ती अनेकांसाठी अॅलर्जिक असण्यासोबतच घसा खवखवण्यासोबत, अंगावर रॅशेस येण्याची भीती असते. कोरोना संसर्गाच्या लक्षणाशी ही लक्षणे साधर्म्य सांगणारी आहेत. त्यामुळे प्रसंगी प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे फिनाईलची निर्जंतुकीरणासाठी होणारी फवारणी बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ३१ मार्च रोजी थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन फिनाईलचा नमुना सोबत घेऊन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी चर्चा केली.जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच तांत्रिक दृष्ट्या कथितस्तरावर ही बाब होत असल्याने प्रसंगी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे ही बाबही हर्षवर्धन सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पालिकास्तरावर अशी फवारणी बंद केली जावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याकडे केली आहे.त्यावर आता जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन कोणती भुमिका घेते याकडे लक्ष लागून राहले आहे. दुसरीकडे या प्रश्नी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढलेल्या पत्रकामध्येही फिनाईलची फवारणी करण्याबाबत कोठेही उल्लेख नसल्याचे सपकाळ यांचे म्हणणे आहे.जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच असलेल्या पालिकेमध्ये असा प्रकार घडत असले तर अन्य पालिकांची स्थिती काय असले असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे. याबाबत त्वरित सजग होण्याची गरज असून त्यासंदर्भाने योग्य कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातही जर असा प्रकार होत असले तर त्याबाबतही सजग राहणे गरजेचे झाले आहे.बुलडाणा पालिकेकडून ३० मार्च रोजी शहरातील काही भागात तथा संगम चौकातील बसस्थानक परिसरात फिनाईलसह अन्य द्रावणाची फवारणी करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याबाबत पालिकेला सुचना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अॅलर्जी व चिडचिडेपणा वाढला- फारूखीप्रामुख्याने सोडीयम हायफोक्लोराईडची फवारणी केली जाते. फिनाईलमुळे काहींना अॅलर्जी होते तथा चिडचिडेपणा वाढतो. फिनाईल फवारणी बंद करण्याबाबत पालिकेला आरोग्य विभागाकडून सुचना दिली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. एस. फारूखी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.