लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : काेरोना विषाणू प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या औषध फवारणीने जलसंपदा विभागावर नवेच संकट आेढवले आहे. या विभागाच्या कार्यालयांमध्ये केलेल्या फवारणीमुळे संगणक बंद पडल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे संगणकाच्या कोणत्याही भागावर सँनिटायजर किंवा औषधांची फवारणी न करण्याचा आदेशच विभागाच्या अवर सचिवांनी शुक्रवारी विभागाच्या सर्व संबंधितांना दिला.कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये सँनिटायजरचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला. फवारणी करताना औषधी द्रव्य संगणकाच्या आतमध्ये गेले. त्यामुळे संगणक बंद पडल्याचा माहिती जलसंपदा विभागाकडे आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत फवारणी करणे, किंवा सँनिटायजरचा वापर करताना कर्मचाऱ्यांनी ते संगणकावर टाकू नये, असे निर्देश देण्याची वेळ या विभागावर आली आहे. संगणकाची सुरक्षा करण्यसााठी संगणक, माँनिटरवर फवारणी करणे किंवा सँनिटायजरचा वापर करण्यास जलसंपदा विभागाने बंदी घातली आहे. त्याबाबतचे पत्र विभागाचे अवर सचिव अ.वि.पगार यांनी सर्व संबंधितांना शुक्रवारी दिले आहे.
संगणकावर फवारणीचा फटका शासकीय कार्यालयाच्या एखाद्या विभागात कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळल्यास त्या विभागात महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली जाते. त्याचवेळी काही कर्मचाऱ्यांनी संगणकावरही फवारणी करून घेतली. त्याचा फटका जलसंपदा विभागाच्या कार्यालयातील संगणकांना बसला आहे.