लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत असून, कोरोना रोखण्यासाठी शासनाने ठरविलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्यानेच कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, टाॅवर चाैक, गोडबोल चाैक, जलंब नाका, निर्मल पाॅइंट, बसस्थानक परिसर, अग्रसेन चाैक, वाडी परिसर, घाटपुरी पिरसर या ठिकाणी दररोज गर्दी होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे साधारणपणे २२ मार्चला लॉकडाऊन सुरू झाला. या घटनेच्या वर्षपूर्तीला केवळ एक महिना राहिला आहे, असे असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णसंख्या वाढण्यामागे कमी झालेल्या कोरोनाच्या चाचण्या हे देखील एक प्रमुख कारण असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, सर्दी, तापाची लक्षणे दिसूनही अनेक जण त्यावर वरवरचे उपचार करून स्वत:ला दिलासा देण्याचे काम करीत आहेत. परंतु, त्यांना कोरोना झाला की नाही, याची वैद्यकीय चाचणी करून घेण्यास आज अनेक अशिक्षितांप्रमाणे सुशिक्षितही घाबरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिल, मे महिन्यात ज्याप्रमाणे प्रभागनिहाय ‘कंपल्सरी टेस्ट’ केल्या होत्या, तशाच पद्धतीने या चाचण्या करण्याची गरज निर्माण झाली आहे. शंभरातील जवळपास ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे टेस्टनंतर पुढे येऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले.
जमावबंदी अंमलबजावणीचे आव्हान कोरोनाकाळात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या नात्याने बुधवारपासून जमावबंदी लागू केली आहे. परंतु, या जमावबंदीच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. आज बाजारातील गर्दी ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरत आहे. पुन्हा एकदा पथक स्थापन करून कारवाईची गरज निर्माण झाली आहे.