कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्राला फटका बसला. यामध्ये एसटी महामंडळाचेही प्रचंड नुकसान झाले. दुसऱ्या लाटेत एसटीची चाके थांबल्यामुळे बुलडाणा विभागाला कोट्यवधीचा फटका बसला होता. मात्र, या दुसऱ्या लाटेनंतर आता महामंडळ पूर्वपदावर येत आहे. महामंडळाने प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता महामंडळातील सर्वच बसेस अँटिमायक्रोबिन कोटिंग केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यासह परराज्यात जाणाऱ्या बसेसमध्येही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवसानंतर सर्वच राज्यात जाणाऱ्या बसेस सुरू केल्या जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली आहे.
परराज्यात जाणाऱ्या बसेस
बुलडाणा - बऱ्हाणपूर
बुलडाणा - सुरत
चिखली - बऱ्हाणपूर
मेहकर - बऱ्हाणपूर
जळगाव जामोद - बऱ्हाणपूर
शेगाव - उज्जैन
शेगाव - बऱ्हाणपूर
बऱ्हाणपूर गाड्या फुल्ल
जिल्ह्यातून मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरला जाणाऱ्या सर्वाधिक बसेस सध्या सोडल्या जात आहेत. या गाड्यांमधील प्रवाशांची वाढती संख्या पाहता सर्वच आगारातून बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या बऱ्हाणपूरला जाणाऱ्या बसेस हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
८० टक्के वाहक-चालकांचे लसीकरण पूर्ण
जिल्ह्यातील एकूण सात आगारात सध्या ८७२ चालक आणि ८०० वाहक कार्यरत आहेत. यापैकी ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसानंतर वाहक - चालकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.
लस न घेतलेल्या वाहक - चालकांना इतर राज्यांत नो एन्ट्री
विभाग नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वाहक - चालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अशाच वाहक आणि चालकांना परराज्यातील बसेसवर ड्युटी दिली जाते. तेव्हा इतर राज्यात लसीकरण न झालेल्या वाहक - चालकांना एंट्री आहे की नाही, याबाबत कुठलीही माहिती पोहचली नसल्याची माहिती विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातून परराज्यात जाणाऱ्या बसेस सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे या बसेस कोरोना विषाणूरोधक असल्याने प्रवाशांनी खासगी वाहनांनी प्रवास न करता महामंडळाच्या बसेसने प्रवास करावा.
-संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा.