बुलडाणा - बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या डोणगाव येथे एक मे रोजी पहाटे साडेपाच वाजता एसटी बसला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पाठीमागून जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एसटी बसमधील १३ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे जखमी झालेले १३ ही प्रवाशी गृहरक्षक दलाचे जवान असून असून निवडणुकीच्या बंदोबस्तावरून ते परत स्वगृही जात होते.हा अपघात डोणगावातील श्री विठ्ठल रुखमाई शाळेजवळ घडला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून वाशिमला एसटी बस (क्र. एमएच-४०-एन-९१६२) जात होती. दरम्यान याच वेळी पाठीमागून येणार्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एमएच-०४-जी-८८१५ क्रमांकाच्या प्रवासी बसने एसटी बसला पाठीमागून जोरदारधडक दिली. एसटी बस ही या शाळेनजीक गतीरोधक असल्याने काहीसी कमी वेगात धावत होती. त्यावेळीच पाठीमागून आलेल्या खासगी प्रवाशी बसने एसटी बसला ही जबर धडक दिल्याचे डोणगाव पोलिसांनी सांगितले.एसटी बसमध्ये निवडणुकीसाठी बंदोबस्तावर गेलेले गृहरक्षक दलाचे २३ जवान हे परतीचा प्रवास करत होते. या अपघातादरम्यान या २३ पैकी १३ जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघात प्रकरणी एसटी बस चालकाच्या तक्रारीवरून खासगी प्रवासी वाहतूक करणार्या बसच्या चालकाविरोधात भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अरूण खनपटे हे करीत आहेत.विशेष म्हणजे डोणगाव येथे उभारण्यात आलेल्या गतीरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले नाहीत. अर्थात इंडियन रोड कॉग्रेसने ठरवून दिलेल्या निकषामध्ये येथील गतीरोधक नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने २८ एप्रिल रोजीच्या अंगातच प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात या ठिकाणी अपघात झाला आहे. हा अपघातही औरंगाबाद-नागपूर या वर्दळीच्या महामार्गावर झाला आहे. या अपघातामध्ये एसटी बस व खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसमधील जखमी १३ जणावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
एसटी बसला खासगी बसची धडक, 13 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 6:04 PM