- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एसटी महामंडळाच्या वतीने दिवाळीच्या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात येते. दरवर्षी या भाडेवाढीच्या माध्यमातून उत्पन्नात भरघोस वाढ पाहायला मिळते. यावर्षी मात्र दिवाळीवर अतिवृष्टीचे सावट निर्माण झाले असल्याचे दिसून आले. परिणामी एसटीच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत यंदा घट झाल्याचे चित्र आहे. एसटी महामंडळाला तब्बल १० लाख ३७ हजार ५४७ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास अशी धारणा सर्वसामान्यांमध्ये असल्याने एसटीने प्रवास करण्यावर सर्वांचा भर असतो. कामानिमित्त बाहेरगावी राहत असलेले दिवाळीच्या कालावधीत मूळ गावी येत असतात. या प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मध्यवर्ती (मुंबई) कार्यालयाकडून बुलडाणा विभागातून लांब पल्ल्याच्या २२ बसफेऱ्यांना मान्यता देण्यात आली होती. यापैकी ३ बसफेºया रद्द झाल्याने १९ फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली. नियंत्रण समिती (अमरावती) कडून १० बसफेºयांची व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी केवळ ६ बसफेºया प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. यामध्ये मलकापूर-यवतमाळ एक, जळगाव जामोद-यवतमाळ दोन, बुलडाणा-यवतमाळ एक, बुलडाणा-पुसद एक तर बुलडाणा-नागपूर या एका बसफेरीचा समावेश आहे. यावर्षी दिवाळी २७ आॅक्टोबर रोजी असल्याने २५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. गतवर्षी दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाला ६ कोटी ५ लाख ३४ हजार ०११ तर यावर्षी ५ कोटी ४ लाख ९६ हजार ४६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात १० लाख ३७ हजार ५४७ रुपयांनी घट झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.वेळेवर बदलावे लागले मार्गदिवाळीच्या कालावधीत सतत पाऊस सुरू असल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आल्याने बसचे काही शेड्यूल रद्द करावे लागले. काही बसच्या मार्गात बदल झाल्याने याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांनी इतर खासगी वाहनांचा आधार घेतला. या सर्व परिस्थितीचा फटका एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला बसला आहे.
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी यादृष्टीने दरवर्षी १० टक्के भाडेवाढ करण्यात येत असते. हा उद्देश साध्य करण्यात बुलडाणा विभाग नेहमीच यशस्वी होतो. यंदा मात्र पावसामुळे अनेक बसचे शेड्यूल रद्द करावे लागल्याने उत्पन्नात घट आली आहे.-ए. यु. कच्छवे,वाहतूक नियंत्रक