बुलडाणा: वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात सहभागी झाल्यानं खामगावात चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय करण्यात आलेल्या या कारवाईचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे.वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गुरूवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खामगाव आगार व्यवस्थापकांनी संपात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांची शुक्रवारी समजूत काढली. मात्र काही कर्मचाऱ्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद न देणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले. शिवाजी आनंदे, अशोक भुसारी, गजानन सोनोने, आर.बी. ठाकरे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. संपातील प्रत्यक्ष सहभागामुळे चारही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. या वृत्ताला खामगाव आगार व्यवस्थापक आर. आर. फुलपगारे यांनी दुजोरा दिला.
ST Strike: बुलडाण्यात चार कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 8:25 PM