सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी आणि शहरातून आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी एसटी महामंडळाने ग्रामीण भागात एसटीची बससेवा सुरू केली आहे. जिल्ह्यातील अगदी दुर्मीळ भागापर्यंत एसटी पोहोचत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता एसटी महामंडळही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची आता खासगी वाहनापासून सुटका होत आहे.
ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना
राज्य परिवहन महामंडळाची बससेवा ग्रामीण भागात बंद असल्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी मुक्कामी बससेवासुद्धा सुरू करण्यात आली आहे. सणासुदीच्या दिवसांत एसटी महामंडळ सर्वत्र बससेवा सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यात मोठी प्रवासी संख्या असल्याने बसायला जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.
शहरी भागात जाणाऱ्या बसेस फुल्ल
सध्या सणासुदीचे दिवस असून, कोरोनानंतर अनेकजण प्रवास करीत आहेत. यामुळे हळूहळू गर्दी वाढली असून, शहरी भागात जाणाऱ्या एसटी बसेस या हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहेत. सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आणखी बससेवा वाढविण्यात येतील अशीही माहिती देण्यात आली आहे.
मुक्कामीचे २५ शेड्यूल्ड सुरू
ग्रामीण भागात एसटी बससेवा सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील सात आगारांतून सध्या ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या एसटी बसेसचे २५ शेड्यूल्ड सुरू करण्यात आले आहेत. या बसेस ठरवून दिलेल्या गावात रात्रीला मुक्कामी राहत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रवाशांची वाढती संख्या पाहता आणि मागणीचा कल पाहून पुढील काही दिवसांत ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या गाड्यांचे शेड्यूल्ड वाढविले जाईल. दिवाळीपर्यंत सर्वच शेड्यूल्ड पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.
-संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा
कोरोनामुळे गावात मुक्कामी येणारी बस आता बंद झाली आहे. दुसऱ्या लाटेनंतर ती बस पुन्हा मुक्कामी येईल अशी आशा होती. मात्र, अद्याप तसे काही झाले नाही. गावात मुक्कामी बस सुरू करावी.
-ऋषिकेश सुसर, शिरपूर
शाळा, महाविद्यालयातील मुले आणि त्याचसोबतच काही मजूरही शहरात सकाळीच जातात. त्यांच्यासाठी सकाळीच जाणारी एसटी बस महत्त्वाची होती. मात्र, तीच बंद झाल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
-विशाल शेळके, शिरपूर.