बुलडाणा : जिल्हा मुख्यालयापासून अग्नेय दिशेला १२ किमी अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्यत्र हलविण्याच्या कारणावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद होऊन ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये उपविभागीय अधिकारी सुहासीनी गोणेवाड, एसडीपीओ बी.बी. महामुनी आणि तहसिलदार सुरेश बगळे यांच्यासह २२ जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी २२ ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून, शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायतच्या इमारतीत हलविण्यात आल्यानंतर आता तणाव निवळला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक दिलीप भूजबळ पाटील यांनी दिली.येथून जवळच असलेल्या डोंगरखंडाळा येथे ग्रामस्थांनी कोणतीही परवानगी न घेता छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात पुतळा हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिस व बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांवर प्रचंड दगडफेक केली. यामध्ये उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोणेकर, तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह पोलिस जखमी झाले. संतप्त ग्रामस्थांनी एक बसही पेटवून दिली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. काही काळ या भागात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. आता गावातील परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे. पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह अधिकारी डोंगरखंडाळा येथे तळ ठोकून आहेत. दरम्यान,गावात शांतता समितीची बैठक पार पडली असून गावकºयांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी गावकºयांना शांततेचे आवाहन केले.
बस पेटविली, सरकारी वाहनांचे नुकसानसंतप्त ग्रामस्थांनी चिखलीकडे जाणाºया बसमधील प्रवाशांना उतरवून बस पेटवून दिली. तसेच महसुल व पोलिस प्रशासनाच्या एकून सहा वाहनांचीही तोडफोड केली. नजीकच्या वरवंड या गावात रास्ता रोको करणाºया ग्रामस्थांपैकी २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे.